पणजी - कोविड -19चे संक्रमण हळूहळू वाढत आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या आरोग्याचा विचार करता शेजारील राज्यांनी ज्याप्रमाणे गोव्यात येणाऱ्यांसाठी कोविड 19 निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे, तसे करावे लागेल, असा इशारा गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. गोवा आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
'...तर दंडात्मक कारवाई'
राणे म्हणाले, की गोव्यात हळूहळू कोविड-19चे संक्रमण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. यासाठी तज्ज्ञ समितीची बैठक बोलावून त्यांची मतेही जाणून घेण्यात आली आहे. समितीचे म्हणणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर ठेवले जाणार असून पुढील दोन-तीन दिवसांत याबाबत ठरविले जाणार आहे. बाहेरील राज्यांप्रमाणे सद्यस्थितीत आम्हाला किमान विमानप्रवाशांना कोविड-19 निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करावे लागेल. तसेच अन्य मार्गाने येणाऱ्यां पर्टकांविषयी निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यातील काही ठिकाणी रेस्टॉरंट आणि हॉटेल्स येथे गर्दी होताना दिसते. यावर नियंत्रण आणण्यासाठी युवा व्यावसायिकांचे गट तयार करून त्यांना उपस्थित विषयी माहिती द्यावी लागेल. जर सांगूनही काहीच फरक पडताना दिसला नाही तर दंडात्मक कारवाई करावी लागेल. तसेच सर्वसामान्य जनतेला मास्क आणि शारीरिक अंतर याविषयी दक्षता घ्यावी लागेल. जे मास्क योग्य पद्धतीने वापरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. दिल्लीत ज्याप्रमाणे दंड वाढविण्यात आला आहे, तसा वाढवावा लागेल. परंतु, हे करत असताना गोमंतकीय अथवा पर्यटक यामध्ये भीती निर्माण होईल, असे प्रकार टाळले पाहिजेत.
'मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले पाहिजे'
पुढे ते म्हणाले, की पुढील काही दिवसांत शिमगोत्सव होणार आहे. परंतु, गर्दी होणारे प्रसंग टाळले पाहिजेत. केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे सांगून राज्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी नव्या मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. सध्या 60 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. डिसा, गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. राजेश्वर नाईक आणि राज्याचे आरोग्यसचिव रवी धवन आदी उपस्थित होते.