पणजी ( गोवा ) - विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपध घेतली आहे. गोव्यात भाजपला एकूण २० जागा मिळाल्या आहेत. तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. सावंत आता गोव्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाशासित सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शिवाय डॉ. प्रमोद सावंतांनी नुकतचं पणजीत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला आहे. पर्यटन, रोजगार निर्मिती आणि इतरही मुद्यांवर लक्ष केंद्रित करणे हे आमचे प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शपथविधी - राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी माजी मंत्री राम शिंदे यावेळी उपस्थित होते. गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा झाला. गोवा विधानसभा संकुलाची खास प्रतिकृती उभारण्यात आली होती.
गोमंतक पक्ष आणि ३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा - राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारपासून विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवले आहे. त्यात प्रमोद सावंत यांना विश्वासमत प्रस्ताव जिंकावा लागेल. नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २० जागा मिळाल्या असल्याने आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि ३ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला असल्याने भाजपचे संख्याबळ २५ च्या घरात गेले आहे. त्यामुळे विश्वासमत प्रस्ताव जिंकणे भाजपला सहज सोपे आहे. तसेच या सत्रात गोवा विधानसभेच्या सभापतींची निवड केली जाईल. त्यांच्या अध्यक्षतेखाली विश्वासमत प्रस्ताव घेतला जाईल.
सावंत यांच्यासोबत अन्य 8 आमदारांनी घेतली शपथ - प्रमोद सावंत यांच्यासोबत अन्य आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. सावंत यांच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. आज एकूण 9 जणांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे आज शपथ घेणारे सर्व आमदार भाजपचे आहे. शपथविधीपूर्वी अशी माहिती मिळाली होती, की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. पण प्रत्यक्ष शपथविधीत केवळ भाजपच्या आमदारांचा समावेश आहे.
या आठ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
1) विश्वजीत राणे
2) माविन गुदिन्हो
3) रवी नाईक
4) रोहन खंवटे
5) गोविंद गावडे
6) बाबूश मोन्सेरात
7) सुभाष शिरोडकर
8) नीलेश काब्राल
विधानसभेच्या एकूण 40 जागा - गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये 20 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच, भाजपने गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांसह तीन अपक्ष आमदारांचा घेतला आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर आज शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे.
डॉक्टर ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा प्रवास - प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी पांडुरंग आणि पद्मिनी सावंत या दाम्पत्याच्या घरी झाला. प्रमोद उच्च विद्याविभूषित आहेत. कोल्हापुरातील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी आयुर्वेद, औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सामाजिक कार्य (Social Work) पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
पत्नी रसायनशास्त्राच्या शिक्षिका - प्रमोद सावंत हे मराठा समाजातील असून त्यांचा विवाह श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, बिचोलीम येथील रसायनशास्त्राच्या शिक्षिका सुलक्षणा सावंत यांच्याशी झालेला आहे. सुलक्षणा सावंत या देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत आणि सध्या भाजप महिला मोर्चाच्या गोवा युनिटच्या अध्यक्षा आहेत. प्रमोद सावंत यांनी डॉक्टरकीची पदवी मिळविल्यानंतर ते गोवा सरकारच्या वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. पण राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता.
गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते - प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेतील साखळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य आहेत. सावंत हे व्यवसायाने आयुर्वेद डॉक्टर आहेत. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते. त्यावेळी प्रमोद सावंत यांची विधानसभेत उपस्थित असलेल्या भाजप युतीच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी 19 मार्च 2019 रोजी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास 17 मार्च 2019 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झाले. गोव्यात आधीच इतरांच्या पाठिंब्यावर भाजपने सरकार स्थापन केले होते. मनोहर पर्रिकर हे सर्वमान्य नेतृत्व होते. त्यामुळेच अवघ्या 13 जागा असून देखील गोव्यात 2017 साली भाजपने सत्ता स्थापन केली होती. पण मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर कोण मुख्यमंत्री होणार? अशी सगळीकडेच चर्चा सुरु होती. अशावेळी मोदी-शाह जोडीने अगदी नवखे असलेले प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली होती.
मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ - सावंत हे मुख्यमंत्री होतील हे त्यावेळी कुणाच्याही ध्यानीमनी देखील नव्हते. कारण त्यावेळी ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपचे सरकार पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण केंद्रीय नेतृत्वाने झटपट निर्णय घेत प्रमोद सावंत यांना थेट 19 मार्च 2019 रोजी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन टाकली होती.
प्रतापसिंह राणे हे मनोहर पर्रिकरांचे राजकीय गुरु - पर्रिकरांनंतर विश्वजीत राणे हेच गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. कारण विश्वजीत राणे यांचे वडील आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे मनोहर पर्रिकरांचे राजकीय गुरु होते. त्यामुळे विश्वजीत राणे हेच पुढील मुख्यमंत्री असे 2017 साली गोव्यात चित्र होते. कारण पर्रिकरांमुळेच विश्वजीत राणे हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आले होते. पण तरीही राणेंना मुख्यमंत्रीपद दिले नाही.
नेहरु युवा केंद्रातून सामाजिक कामांना सुरुवात - प्रमोद सावंत हे सुरुवातीपासूनच भाजपची विचारसरणी मानणारे होते. पण सुरुवातीच्या काळात त्यांनी नेहरु युवा केंद्रातून सामाजिक कामांना सुरुवात केली होती. सावंत यांचे वडील हे मनोहर पर्रिकर यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळेच प्रमोद सावंत यांचे देखील पर्रिकरांशी चांगले संबंध होते. त्यांच्याच मुशीत प्रमोद सावंत हे तयार झाले होते.
भाजप पक्ष संघटनेत आल्यानंतर सावंत हे तात्काळ आरएसएसशी देखील जोडले गेले. त्यामुळे पक्ष आणि संघटना या दोन्ही पातळीवर त्यांनी स्वत:ला व्यवस्थितपणे रुळवून घेतले. अशातच 2012 साली पर्रिकरांनी त्यांना साखळी मतदारसंघातून तिकट देऊ केले. यावेळी प्रमोद सावंत हे तिथून निवडूनही आले. त्यानंतर पुन्हा एकदा 2017 साली ते याच मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले.
अल्पमतातील सरकार चालवताना चांगली कामगिरी - दुसऱ्यांदा निवडून गेलेल्या प्रमोद सावंत यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे संविधानिक पद असल्याने प्रमोद सावंत यांना काही काळ पक्षाशी संबंधित कार्यक्रमांपासून स्वत:ला दूर ठेवावे लागले होते. पण विधानसभा अध्यक्षपद भूषवताना आणि अल्पमतातील सरकार चालवताना त्यांनी केलेली कामगिरी ही भाजपशी अत्यंत महत्त्वाची होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पर्रिकरांच्या निधनानंतर सावंत यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले.
सर्वमान्य नेतृत्व अशी ओळख - प्रमोद सावंत हे खूपच तरुण नेते आहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच प्रशासनाशी सुसंवाद साधत त्यांनी गेल्या अडीच वर्षात गोव्याचा राज्यकारभार समर्थपणे सांभाळला आहे. तर पक्षीय पातळीवर देखील आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून प्रमोद सावंत यांना आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील सर्वमान्य नेतृत्व अशी आता त्यांची ओळख झाली आहे.
हेही वाचा - आचारसंहिता उल्लंघनाची काँग्रेस नेत्याची तक्रार, सर्वोच्च न्यायालयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नोटीस