पणजी - बाणावली बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल त्यांना सद्बुद्धी प्राप्त होण्यासाठी काँग्रेसने रविवारी सद्बुद्धी यात्रेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भाजप कार्यकर्ते जोरदार शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेचे स्वागत करण्यासाठी मैदानात उतरले. भाजप कार्यकर्त्यांचा विरोध व आक्रमकता पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे काँग्रेसला यात्रा काढण्याआधीच ती गुंडाळावी लागली.
हेही वाचा - Tokyo Olympics : चक दे इंडिया! ग्रेट ब्रिटनचा धुव्वा उडवत भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत
यात्रेवेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटून त्यांना फुले देऊन, तुम्हाला राज्य चालवण्यासाठी सद्बुद्धी प्राप्त होवो, असा संदेश देणार होते. काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत स्वतः कार्यकर्त्यांसह मैदानात उतरल्या. त्यांनी काँगेसला एकप्रकारे आव्हानच दिले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. काँग्रेसच्या नेते स्वतः किती भ्रष्टाचारी व गुन्हेगार आहेत, ते पाहावे, असे घणाघात त्यांनी काँग्रेस नेत्यांवर केला.
भाजप कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
आपल्याच मतदारसंघात येऊन काँग्रेस सद्बुद्धी यात्रा काढणार असल्याचे समजतात भाजप कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांच्या स्वागताला गेले. कार्यकर्त्यांनी जोरदारपणे शक्तिप्रदर्शन केले. मात्र, भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी काँग्रेसची यात्रा अर्ध्या वाटेतच रोखत काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि काँग्रेस महिला कार्यकर्त्यांच्या झटापटीत काही महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पोलिसांकडून कपडेही फडण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला.
अखेर भाजपने काँग्रेस नेत्याचे पुतळे जाळले
भाजप कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जमून काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेची वाट पाहत होते. मात्र पोलिसांनी मध्येच अडवून काँग्रेसचे नेते दिगंबर कामत आणि गिरीश चोदणकर यांना ताब्यात घेतल्यामुळे ते मुख्यमंत्रांच्या निवासस्थानी पोहचू शकले नाही. अखेर घटनास्थळी काँग्रेस नेते न पोहचू शकल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी दिगंबर कामत व चोदणकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांचा निषेध केला.
हेही वाचा - Tokyo Olympics : जय हो! भारताला आणखी एक पदक; पी. व्ही. सिंधू कांस्य पदकाची मानकरी