वाराणसी Bharat Mata Temple Kashi : उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एक असं अद्भुत मंदिर आहे. हे मंदिर महात्मा गांधींच्या सूचनेनुसार बांधण्यात आलं होतं. बाबू शिवप्रसाद गुप्ता यांनी हे मंदिर बांधलं आहे. आजही या मंदिराला सर्व धर्माचे लोक भेट देतात. या मंदिराची विशेष बाब म्हणजे, इथे कुठलीही मूर्ती नसून मकराना मार्बलवर अखंड भारताचा नकाशा कोरण्यात आला आहे. या मंदिराचं उद्घाटन स्वतः महात्मा गांधी यांनी केलं होतं. मंदिराच्या उद्घाटनावेळी गांधींजींनी अखंड भारताच्या या नकाशाच्या आधारे सर्वधर्मसमभावाचा संदेश देतान लोकांना एकजूट राहण्याचं आवाहन केलं होतं.
भारतमातेचं मंदिर : वाराणसीच्या चंदुआ सिगरा भागात असलेलं भारतमातेचं हे अद्भूत मंदिर आजही महात्मा गांधींच्या उपस्थितीची अनुभूती देतं. मंदिरात वापरलेले लाल दगड, मकराना मार्बल आणि इतर बांधकाम साहित्य या मंदिराला आणखीनच भव्य बनवतं. या मंदिराचं बांधकाम १९१७ नंतर सुरू झालं. १९२४ मध्ये ते पूर्ण झालं. जेव्हा ब्रिटीश त्यांना विरोध करणार्या लोकांना चिरडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, त्यावेळी बाबू शिवप्रसाद गुप्ता यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून या भव्य मंदिराच्या बांधकामाची रूपरेषा तयार केली.
प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक येतात : बरेच वर्ष हे मंदिर उघडता आलं नाही. १९३६ मध्ये जेव्हा महात्मा गांधी काशीला आले तेव्हा या मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. येथील केअरटेकर राजू सिंह सांगतात की, येथे प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक येतात. याचं मुख्य कारण हे आहे की, जरी हे मंदिर असलं तरी येथे कोणतीही मूर्ती किंवा पुतळा स्थापित केलेला नाही. मकराना मार्बलवर १९१७ सालचा अखंड भारताचा भव्य नकाशा आहे. या मंदिराच्या उद्घाटनावेळी महात्मा गांधी म्हणाले होते की, हे मंदिर सर्व धर्म, हरिजन आणि प्रत्येक पंथातील लोकांसाठी महत्त्वाचं स्थान असेल. विशेष म्हणजे, त्यावेळी रेल्वे आणि वाहतुकीची फारशी सुविधा नसतानाही उद्घाटन सोहळ्याला तब्बल २५,००० हून अधिक लोक पोहचले होते.
गणितीय सूत्रांच्या आधारे मंदिर बांधलं : शिवप्रसाद गुप्ता यांनी दुर्गाप्रसाद खत्री यांच्या देखरेखीखाली २५ कारागीर आणि ३० मजूर कामावर घेऊन गणितीय सूत्रांच्या आधारे हे मंदिर बांधलं होतं. मकराना मार्बलवर अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका स्पष्टपणे दिसतात. तसेच यावर ४५० पर्वत रांगा आणि शिखरं, मैदाने, पठार, जलाशय, नद्या, महासागर, त्यांची उंची आणि खोली सर्व चिन्हांकित आहेत. चित्राची लांबी ३२ फूट २ इंच आणि रुंदी ३० फूट २ इंच आहे, जी ७६२ चौरसांमध्ये विभागली गेली आहे. पुण्यातील एका आश्रमात मातीवर कोरलेला नकाशा पाहून शिवप्रसाद यांनी या मंदिरात मार्बलचा नकाशा बनवण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा :