दिनहाटा (प. बंगाल) : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील दिनहाटा येथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये झालेल्या वादात किमान पाच जण जखमी झाले आहेत. (TMC and BJP supporters clash). शनिवारी रात्री शहरातील निगम बाजार परिसरात आयोजित पार्टीच्या कार्यक्रमातून तृणमूलचे कार्यकर्ते परतत असताना ही घटना घडली. (TMC BJP clash in Dinhata Uttar Dinajpur).
दोन कार्यकर्ते गंभीर जखमी : सत्ताधारी पक्षाच्या आरोपानुसार, दोन तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. नूर इस्लाम मिया आणि मोयनल शेख अशी जखमींची नावे आहेत. दोघांना दिनहाटा उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यानंतर त्यांना कूचबिहारमधील एमजेएन वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दोन्ही पक्षांकडून मारहाणीचा दावा : तृणमूलचे नेते बिशू धर (TMC leader Bishu Dhar) म्हणाले की, "निगम बाजारातील कार्यक्रमानंतर पक्षाचे कार्यकर्ते घरी परतत असताना भाजपने त्यांच्यावर हल्ला केला". दरम्यान, भाजपने तृणमूलवर उलट आरोप लावले आहेत. त्यांचा असा दावा आहे की, दिनहाटा येथे त्यांचे नेते आणि कार्यकर्ते आदल्या दिवशी अशाच हल्ल्याच्या विरोधात आंदोलन करत असताना टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.