कोलकाता - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि टीएमसी नेते यांच्यादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. सध्या टीएमसी खासदार महुआ मोइत्रा आणि राज्यपाल जगदीप धनखड हे राजभवनातील नियुक्त्यावरून आमने-सामने आहेत. राजभवनात नातेवाईकांची नियुक्ती केल्याचा आरोप महुआ मोइत्रा यांनी राज्यपालांवर केला होता. राज्यपाल जगदीप धनखड यांनी महुआ मोइत्रांना उत्तर दिले असून सर्व आरोप फेटाळले आहेत. राजभवनात ओएसडीपदावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांशी आपले दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.
आज पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या "अंकल जी" टिप्पणीला प्रत्युत्तर दिले. जगदीप धनखड यांनी ट्विट केले आहे, की 'राजभवनात नियुक्त केलेले ओएसडी हे माझे नातेवाईक नाहीत. ओएसडी तीन राज्यातील आहेत आणि चार वेगवेगळ्या जातींचे आहेत. त्यापैकी कोणीही जवळच्या कुटुंबातील नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील 'कायदा व सुव्यवस्था परिस्थिती' या महत्त्वाच्या विषयावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी टीएमसीचे हे धोरण आहे, असेही ते म्हणाले.
काय म्हटलं होते महुआ मोइत्रा यांनी?
खासदार महुआ मोइत्रा यांनी रविवारी टि्वट करत राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप केला होता. राज्यपाल जगदीप धनखड यांनी राजभवनात आपल्या नातेवाईकांची नियुक्ती केली आहे, असा आरोप महुआ मोइत्रा यांनी केला होता. तसेच संबंधित नातेवाईकांच्या नावाची लिस्टही त्यांनी टि्वटद्वारे जारी केली होती. त्या लिस्टमध्ये सहा जणांची नावे होती. अभुद्योय सिंग शेखावत, अखिल चौधरी आणि किशन धनकर,रूची दुबे, प्रशांत दिक्षित आणि श्रीकांत जनार्दन राव हे राज्यपालांचे नातेवाईक असल्याचे महुआ यांनी म्हटलं होते. तसेच 'अंकल जी, तुम्ही दिल्लीला परत गेल्यास राज्यातील परिस्थिती सुधारेल. दिल्ली परत जा आणि दुसरी नोकरी शोधा. तसेच जाताना राजभवनात स्थायिक झालेल्या आपल्या कुटुंबालाही परत घेऊन जा, अशी खोचक टि्वट महुआ मोइत्रा यांनी केली होती.
हेही वाचा - 'अंकल जी, राजभवनातल्या सोयऱ्या-धायऱ्यांसह दिल्लीला परत जा'; महुआ मोइत्रांची राज्यपालांवर खोचक टीका