गुवाहाटी - आसाममधील चार मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार असल्याची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे. रताबारी, सोनाई, हफलॉन्ग विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रांवर पुन्हा मतदानाची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. 20 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असल्याचे आयोगाने नमूद केले.
'लेखी माहिती द्यावी'
संबंधित मतदारसंघात 1 एप्रिलला मतदान झाले होते. लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 58च्या पोट-कलम (2) (अ)अंतर्गत त्या मतदानाला निवडणूक आयोगाने अमान्य केले आहे. सादर केलेल्या अहवालाच्या आधारे आणि सर्व भौतिक परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित तिन्ही विधानसभा मतदारसंघात मतदान पुन्हा होणार असल्याची घोषणा करावी व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना याबाबत लेखी माहिती द्यावी, असे निर्देश आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आसाममध्ये 1 एप्रिल रोजी झालेल्या दुसर्या टप्प्यातील मतदानानंतर पाथरकांडी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आसाममधील तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक 6 एप्रिल रोजी संपली होती. मतमोजणी 2 मेला होणार असून निकाल जाहीर होईल.
भाजपा नेत्यांच्या गाडीत ईव्हीएम
भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम सापडले होते. या प्रकरणात निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. या घटनेनंतर आसाममध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. काही ठिकाणी हिंसाही झाल्याचे पाहायला मिळाले होते.