लखनऊ : कोरोना विषाणू हा वारंवार आपले रुप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. भारतातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावं देण्यात आली होती. यामधील डेल्टा स्ट्रेनचा 'डेल्टा प्लस' हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा या व्हेरिएंटवर कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता असल्याचे डॉ. शीतल वर्मा यांनी म्हटले आहे. त्या केजीएमयूमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.
डॉ. वर्मा यांनी सांगितले, की भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेला हा डेल्टा (बी.१.६१७.२) व्हॅरिएंटच कारणीभूत होता. आता दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली, तरी डेल्टा व्हॅरिएंटही 'डेल्टा प्लस' मध्ये रुपांतरीत झाला आहे. सध्या देशात डेल्टा प्लसची लागण झालेले सहा रुग्ण आहेत. जर लोकांनी आवश्यक ती खबरदारी नाही बाळगली, तर या व्हॅरिएंटमुळेच देशात तिसरी लाटही येऊ शकेल. दुसऱ्या लाटेमध्ये उपचारासाठी वापरण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिवीर आणि स्टेरॉईड थेरपी अशा उपचारांचा परिणाम नंतर नंतर दिसून आला नाही. त्यामुळे ही उपचार पद्धती आता बंद करण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला होता.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाने ४७ वेळा बदलले रुप..
महाराष्ट्रात केलेल्या संशोधनानुसार, तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची वेगवेगळी रुपं पहायला मिळाली. प्लाझ्मा, रेमडेसिवीर आणि स्टेरॉईडयुक्त औषधांच्या अतीवापरामुळे कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात म्युटेशन झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. यामुळेच दुसऱ्या राज्यांमध्येही सीक्वेन्सिंग करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), आयसीएमआर आणि दिल्लीतील एनसीडीसी यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे.
सीक्वेंसिंगमध्ये हे व्हेरिएंट आले समोर..
संशोधकांनी तपासलेल्या नमुन्यांमध्ये बी.१.६१७ या व्हेरिएंटचे २७३, बी.३६.२९ या व्हेरिएंटचे ७३, बी.१.१.३०६ व्हेरिएंटचे ६७, बी.१.१.७ व्हेरिएंटचे ३१, बी.१.१.२१६ व्हेरिएंटचे २४, बी.१.५९६ व्हेरिएंटचे १७ आणि बी.१.१ व्हेरिएंटचे १५ नमुने आढळून आले. यासोबतच १७ नमुन्यांमध्ये बी.१ आणि १२ लोकांमध्ये बी.१.३६ हे व्हेरिएंट दिसून आले आहेत. यासोबत आणखीही काही व्हेरिएंट दिसून आले आहेत, ज्यांच्यावर संशोधन सुरू आहे.
यानंतर संशोधकांनी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामधील सीक्वेन्सिंग वाढवण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच, ज्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून आले, त्या राज्यांमध्येही सीक्वेन्सिंग वाढवण्याची गरज असल्याचे डॉ. वर्मा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : भारतातील कोरोना स्ट्रेन्सना मिळाली ओळख; 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावं