नवी दिल्ली - केवळ पाच विटा आणि एक मूर्ती ठेवल्याने एखादे ठिकाण धार्मिक स्थळ बनत नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिला आहे. दिल्लीमधील डिफेन्स कॉलनीतील तात्पुरते बनवलेले मंदिर हटवण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे विधान केले आहे.
हेही वाचा - गीतकार जावेद अख्तर मानहानी प्रकरण; खटला दुसऱ्या न्यायालयात चालविण्याची कंगनाची फेटाळली याचिका
डिफेन्स कॉलनीतील एका रहिवाशाने ही याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, कोरोनाच्या संक्रमणादरम्यान कोणीतरी बेकायदेशीरपणे भीष्म पितामह मार्गाच्या फूट पाथवर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरते मंदिर बांधले होते. हे मंदिर याचिकाकर्त्याच्या मालमत्तेच्या अगदी समोर आहे. या मंदिरात काही समाजकंटक येऊन जुगार खेळतात आणि गर्दी करतात. यामुळे याचिकाकर्त्याला त्याच्या जागेपर्यंत जाणे कठीण झाले होते.
केवळ पाच विटा आणि एक मूर्ती ठेवल्याने धार्मिक स्थळ होऊ शकत नाही - न्यायालय
यावेळी न्यायालयात दिल्ली सरकारच्यावतीने वकील अनुपम श्रीवास्तव यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, या प्रकरणावर धार्मिक कमिटीने कोणताही निर्णय घेतला नाही. हे मंदिर हटवले तर येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. न्यायालयाने यावेळी दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले की, तात्पुरते बनवलेले मंदिर हटवण्यासाठी धार्मिक कमिटीची गरज नाही. मोठे मंदिर असेल तर धार्मिक कमिटीकडे याबाबत जबाबदारी दिली जाते. मात्र, केवळ पाच विटा आणि एक मूर्ती ठेवल्याने कोणतेही स्थळ हे धार्मिक होऊ शकत नाही.
हेही वाचा - 100 कोटी डोज हा केवळ आकडा नसून देशाच्या सामर्थ्याचे प्रतिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी