जयपुर - राजस्थानमध्ये रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बरेच लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासन बचाव अभियान राबवित आहे. आमेर महलासमोरील टेकडीवर असलेल्या वॉच टॉवरवर वीज कोसळली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. टेकडीवरील झुडपात शोध मोहीम राबवून जखमींचा शोध घेण्यात येत आहे. 20 हून अधिक लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी आणि मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तवही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की घटनास्थळाभोवती खड्डे आणि झुडुपे आहेत. ज्यात जखमींचा शोध सुरू आहे. सायंकाळी पाऊस झाल्यानंतर काही लोक फिरायला टेकडीवर आले होते. अचानक वीज कोसळल्याने ही घटना घडली.
उत्तरप्रदेशमध्येही निसर्गाचा कहर -
उत्तरप्रदेशमध्ये विविध ठिकाणी वीजा कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाद, कौशाम्बी, कानपुर नगर, कानपुरमध्ये आकाशातील वीज कोसळून मृत्यू झालेल्यांच्या प्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना नियमावलीनुसार तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच जखमी झालेल्यांवर योग्य ते उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पावसाळ्यात विजांपासून बचाव कसा करायचा -
- स्वत:च्या घरांत किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा.
- गोठा किंवा एखादे शेणाचे शेड तुमचा विजेपासून बचाव करू शकणार नाही.
- इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळू नका.
- झाडाखाली चुकूनही उभे राहू नका.
- लोखंडाच्या किंवा तांब्याच्या वस्तू जवळ ठेवू नका.
- जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
- खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.
- विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.