नवी दिल्ली - कोरोनाचा देशात शिरकाव झाला आणि लॉकडाउन लावण्याची वेळ सरकारवर आली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांच्या हातचे काम गेले. लॉकडाउनमुळे हातावर कमावून पोटावर खाणाऱ्यांचे अतोनात हाल झाले आणि आताही होत आहेत. आशातच काही माणुसकीची उदाहरणेही समोर येत आहेत. अशीच एक मानवतेचा संदेश देणारी घटना दिल्लीत घडली आहे. काइफोसिस आजाराने पीडित असलेल्या एका वृद्ध महिलेला काही तासातच 225 लोकांनी 2 लाख 14 हजार 831 रुपयांची मदत केली आहे.
काइफोसिस पीडित वृद्ध महिला मक्याचे कणीस विकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी संबंधित वृद्ध महिलेची भेट घेतली. तसेच स्वाती मालीवाल यांनी वृद्ध महिलेला मदत करण्याचे लोकांना आवाहन केले. अगदी काही तासांतच ketto च्या माध्यमातून 225 लोकांनी 2 लाख 14 हजार 831 रुपयांची मदत जमा झाली. ही मोहीम आणखी 45 दिवस चालणार आहे.
संबंधित महिला 80 वर्षीय असून मक्याचे कणीस विकून त्यातून मिळाणाऱ्या कमाईतून त्या आपला आणि आपल्या नातवांचा उदारनिर्वाह चालवतात. दिल्लीच्या रघुबीर नगरमध्ये राहत असून 12 वर्षीय नात आणि 10 वर्षीय नातवाचा सांभाळ करतात. शरीर साथ देत नसले, तरीही त्या स्ट्रीट वेंडरच्या रुपात काम करत आहेत. वृद्ध महिलेची ही परिस्थिती पाहिल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी टि्वट करून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
अजूनही माणुसकी शिल्लक...
वृद्ध महिलेची स्थिती पाहून मन हेलावून गेले. जेव्हा त्या गाडा ओढतात, ते दृश्य फारच दु:खद आहे. आपण सर्वांनी त्यांची मदत करायला हवी. महिला आयोगाने त्यांनी काही मदत केली आहे. समाजातील काही लोकांनी पुढाकार घेत, मदतीचा हात द्यावा. ketto द्वारे जमा झालेली रक्कम थेट महिलेच्या खात्यामध्ये जमा केली जाईल, असे टि्वट मालीवाल यांनी केले होते. त्यांच्या टि्वटला भरपूर प्रतिसाद मिळाला असून अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे दिसून आले.
हेही वाचा - आदिवासी अनाथ मुलींचे नाथ बनले जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे २० अधिकारी
हेही वाचा - जॅकलिन फर्नांडिजने मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी दिले रेनकोट्स!