मुंबई - आयआयटी-बॉम्बे येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक मनोज गोपालकृष्णन यांनी एक कोविड टेस्ट किट तयार केले आहे. त्यांच्या या अत्याधुनिक कोविड टेस्टिंग किटला भारतीय औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) नॉन-रेग्युलेटेड मेडिकल डिव्हाइस म्हणून व्यावसायिक वापरण्यासाठी मान्यता दिली आहे. या किटचे नाव 'टेपेस्ट्री' ठेवण्यात आले आहे. या किटच्या माध्यमातून कमी किमतीत जलद कोरोनाची चाचणी करता येते.
'टेपेस्ट्री' किटची सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. मनोज गोपालकृष्णन यांनी हे किट आयआयटी बॉम्बेतील त्यांच्या इतर १० सहकाऱ्यांसोबत मिळून तयार केलं आहे. वृत्तानुसार, बंगळुरू येथील स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन इन्स्टिट्यूट आणि बंगळुरूमधील सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र विभागाने गेल्या जुलै महिन्यापासून या किटचा वापर करून ८ हजार पेक्षा जास्त लोकांची चाचणी करण्यात आली. तसेच या किटची पहिली क्लिनिकल चाचणी गेल्या ऑगस्ट महिन्यात टाटा मेमोरियल सेंटरमध्ये घेण्यात आली, तर फेब्रुवारी महिन्यापासून हैदराबादच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कडून फिल्ड टेस्ट घेण्यात आल्या.
दरम्यान, या किटचा वापर कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी मदतशीर ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी २६ जून रोजी महाराष्ट्रात 9,812 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच राज्यातील रिकव्हरी रेट सध्या 95.93 टक्क्यांवर असून मृत्यूदर दोन टक्क्यांवर आहे. राज्यात शनिवारी 2,34,367 चाचण्या करण्यात आल्या.