नवी दिल्ली - जगभरामध्ये नव्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रसार होत आहे. यातच भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्येत 20 हजार 35 ने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येचा आकडा 1 कोटी 2 लाख 86 हजार 709 वर पोहचला आहे. तसेच 256 मृत्यूची नोंद झाल्याने 1 लाख 48 हजार 994 बळी आतापर्यंत गेले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रिकव्हरी रेट वाढला असून तो 96.08 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर हा 1.45 आहे.
98 लाख 83 हजार 46 रुग्ण कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 2 लाख 54 हजार 254 जणांवर देशातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत. तर काल दिवसभरामध्ये आयसीएमआरने 10 लाख 62 हजार 420 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. तर 17 कोटी 31 लाख 11 हजार 694 कोरोना चाचण्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाला होता. तेव्हा फक्त एक कोरोना लॅब होती. मात्र, आता देशभरात लॅबचे जाळे पसरले आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.
भारतामध्ये नव्या कोरोना विषाणूचे २५ रुग्ण सापडले -
भारतामध्ये नव्या कोरोना विषाणूचे २५ रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवा विषाणू सापडला असून त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे भीत पसरली आहे. २५ पैकी २० जण म्युटेट स्ट्रेनचे बाधित असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना केंद्राच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोना लसीकरण -
कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर २ जानेवारीला होणार असून त्यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. जागतिक कोरोना संकटाविरुद्धच्या या लढाईत भारताने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. गेल्या 6 महिन्यांत कोरोनाच्या नवीन बाधितांच्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट होऊन, ही संख्या 25 हजारांपेक्षा कमी झाली आहे. त्याबरोबरच उपचाराखालील रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे.