मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची जयंती. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन (Childrens Day 2022) म्हणून साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. मुलांवरील त्यांचे अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्ताने भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
याआधी भारतात बालदिन 20 नोव्हेंबरला : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध भाषणात म्हटले होते, आजची मुले उद्याचा भारत असतील. आपण त्यांना ज्या पद्धतीने वाढवतो ते देशाचे भविष्य ठरवतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे 1964 साली निधन झाले आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव संसदेने मंजूर केला. याआधी भारतात बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता.
बालदिनाचे महत्त्व : मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. तसेच, त्यांना आपले आयुष्य फुलविण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपल्यापैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण करून देणे गरजेचे आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस : पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. विद्यार्थीदशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती.
अनेक योजना त्यांनी राबवल्या : पंतप्रधान म्हणून लोकशाहीला मजबूत करणे, देश आणि घटनेतील धर्मनिरपेक्ष प्रतिमा प्रस्थापित करणे आणि भारताच्या विकासात दीर्घकालीन फायद्याच्या ठरतील अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. त्यांचे वडील मोतीलाल नेहरु हे प्रसिद्ध वकील होते. खूप कमी वयात शिक्षणासाठी पंडित जवाहरलाल नेहरु इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्ष राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1912 मध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले. 1919 मध्ये अलाहाबादच्या होम रुल लीगचे सचिव बनले. 1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले.