चेन्नई : चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्रयानातील रोव्हर विक्रम लँडरमधून खाली आलं असून ते चंद्रावर फिरत आहे. चंद्रावरील मातीत चंद्रयान 3 मधील रोव्हरचे ठसे उमटत असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक उन्नीकृष्णन नायर यांनी माहिती दिली. गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास विक्रम लँडरमधून रोव्हर खाली आलं. या रोव्हरनं चंद्रावरील मातीत आपले ठसे सोडल्याचंही संचालक उन्नीकृष्णन नायर यांनी स्पष्ट केलं.
विक्रम लँडरमधून रोव्हर आलं खाली : विक्रम लँडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात बुधवारी इस्रोला यश आलं आहे. विक्रम लँडरमध्ये असलेल्या रोव्हरनं गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास खाली येत आपले ठसे चंद्रावरील मातीत सोडले आहेत. त्यामुळे चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी होऊन नियोजितपणे काम करत असल्याचं संचालक उन्नीकृष्णन नायर यांनी स्पष्ट केलं.
रोव्हरच्या चाकावर कोरला इस्रोचा लोगो आणि चिन्ह : विक्रम लँडरमधून खाली आलेल्या रोव्हरचे ठसे चंद्रावरील मातीत उमटत आहेत. रोव्हरच्या चाकांवर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) लोगो आणि राष्ट्रीय चिन्ह कोरलं आहे. त्यामुळे रोव्हर फिरत असलेल्या ठिकाणी हा ठसा उमटला जातो. चंद्रयान 3 मोहिमेचं यश हे भारतासाठी खास ठरलं आहे. त्यामुळे भारत चंद्रावर अभ्यास करणार आहे. भारतानं चंद्रावर पाठवलेल्या रोव्हर आणि लँडर विक्रम यांच्या माध्यमातून इस्रोला ही माहिती मिळणार आहे. यासाठी इस्रोनं रोव्हर आणि लँडरचं सौर पॅनल तैनात केलं आहे. त्यामुळे रोव्हर आणि विक्रम लँडरला उर्जा मिळण्याची कोणतीही अडचण येणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
रोव्हर चंद्राचे नमुने गोळा करुन पाठवणार लँडरला : रोव्हर चंद्राचे नमुने गोळा करुन ते लँडरला डाटा पाठवेल. तर विक्रम लँडर तो डाटा बंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) येथील मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्सला पाठवेल, अशी माहिती संचालक उन्नीकृष्णन यांनी दिली. विक्रम लँडर नियोजित जागेवर उतरलं की नाही, याबाबत मुल्यांकन करावं लागेल, मात्र सारं काही नियोजित योजनेनुसार घडल्याचंही संचालक उन्नीकृष्णन नायर यांनी यावेळी सांगितलं आहे. ( IANS COPY )
हेही वाचा -