नवी दिल्ली : दरवर्षी दहावी आणि बारावीच्या केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा (सीबीएसई) या फेब्रुवारीमध्ये सुरू होतात. मात्र, २०२१मधील बोर्ड परीक्षा फेब्रुवारीमध्ये होतील असा कोणताही प्रस्ताव अद्याप मांडण्यात आला नाही. यासोबतच, बोर्ड परीक्षांशी संबंधित कामकाजालाही अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली.
मंगळवारी 'शिक्षा संवाद' या कार्यक्रमाच्या २२व्या भागामध्ये शिक्षणमंत्री बोलत होते. यामध्ये ते शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतात. या कार्यक्रमामध्ये देशभरातील शिक्षकांनी बोर्ड परीक्षा, ऑनलाईन परीक्षा आणि शिक्षकांचे प्रशिक्षण अशा अनेक शैक्षणिक मुद्द्यांवर पोखरियाल यांच्याशी चर्चा केली. यामध्ये देशभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते.
बोर्डाची परीक्षा ऑनलाईन नाही..
२०२१मधील सीबीएसई परीक्षा ऑनलाईन होईल का याबाबत विचारले असता, तसा काही विचार नसल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले. बोर्डाची परीक्षा ही नेहमीप्रमाणे पेन आणि कागदाचा वापर करुनच द्यावी लागणार आहे.
परीक्षांचे वेळापत्रक नक्की नाही..
सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या नाहीत. मात्र या परीक्षा तीन महिने पुढे ढकलण्याची मागणी अनेक पालक करत आहेत अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत त्यांनी शिक्षण मंत्रालयाला प्रस्ताव दिल्याचेही सांगितले.
हेही वाचा : आग्र्याजवळ ट्रकला धडकल्यानंतर कारला आग; पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू