नवी दिल्ली/चंदीगड- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे लवकरच नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत. सुत्राच्या माहितीनुसार कॅप्टन अमरिंदर यांच्या नव्या पक्षाचे नाव हे 'पंजाब विकास पक्ष' असणार आहे.
सुत्राच्या माहितीनुसार नवीन पक्षाची स्थापना करण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग हे येत्या काही दिवसांत विश्वासू नेत्यांची बैठक घेणार आहे. त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू विरोधी गटातील नेत्यांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा-नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची 'ही' आहेत 5 कारणे
नवज्योत सिंग सिद्धूंना पराभूत करणे हे पहिले उद्दिष्ट
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह यांना पराभूत करणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचे यापूर्वीच कॅप्टन अमरिंदर यांनी जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नवीन पक्षाकडून सिद्धू यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार दिला जाणार आहे. मध्यंतरीच्या काळात कॅप्टन हे शेतकरी नेत्यांशी संपर्क करणार आहेत. तसेच काही लहान पक्षांनाही सोबत घेणार आहेत.
हेही वाचा-अमरिंदर सिंग-अमित शाह यांची दिल्लीत भेट; कॅप्टन म्हणाले, शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा!
पक्षात राहण्यात काय अर्थ आहे?
अमरिंदर सिंग यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना गुरुवारी राजकीय भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की मी आता काँग्रेसपासून दूर आहे. काँग्रेसमध्ये राहणार नाही. अशा पद्धतीने मला वागविता येणार नाही. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कॅप्टन म्हणाले, की गेली 52 वर्षे मी राजकारणात आहे. सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस अध्यक्षांनी मला राजीनामा देण्यास सांगितले आहे. मी कोणताही प्रश्न विचारला नाही. सायंकाळी 4 वाजता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला आहे. जर तुम्हाला 50 वर्षानंतरही संशय वाटत असेल आणि माझी विश्वासर्हता पणाला लागली असेल तर, पक्षात राहण्यात काय अर्थ आहे?
हेही वाचा-ठरलं! काँग्रेसला अमरिंदर सिंग दाखविणार 'हात'; कमळाचा करणार नाही स्वीकार
यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी सोडला होता पक्ष
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीदेखील पक्ष सोडण्याचे जाहीर केले होते. कॅप्टन अमरिंदर यांनी 1980 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र, 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर त्यांनी काँग्रेस सोडून अकाली दलात प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी 1998 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.