नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी म्हणजेच आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी चीन,पाकिस्तान, मेड इन इंडिया, रोजगार आदी मुद्यांवर भाष्य केले.
मोदी सरकारने पाकिस्तान आणि चीनला एकत्र आणले -
भारताच्या धोरणाचा फोकस हा चीन आणि पाकिस्ताला वेगळे ठेवणे हा होता. पण, तुम्ही (मोदी सरकारने) जम्मू-काश्मीर आणि परराष्ट्र धोरणात मोठ्या चुका करत पाकिस्तान आणि चीनला एकत्र आणलं आहे. ही सर्वांत मोठी चूक असून हा भारतासाठी अत्यंत गंभीर धोका आहे. चीनचे ध्येये स्पष्ट असून ती डोकलाम आणि लडाखमध्ये आपण पाहू शकतो. चीन शस्त्रे खरेदी करत असून आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे. लक्षात घ्या, जर काही विपरीत घडले तर त्याला सर्वस्वी भाजपा सरकार जबाबदार असेल, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.
राजा कुणाचेही ऐकण्यास तयार नाही -
भारत हा एक राज्यांचा संघ आहे. ही एक प्रकारची भागीदारी आहे. भारत हे एखादे राज्य नाही. ज्यावर हुकमशाही चालेल. त्यामुळे भारतावर तुम्ही कधीही राज्य करू शकणार नाही. राजेशाही प्रकारची संस्थाने ही काँग्रेसने 1947 मध्ये बरखास्त केली होती. पण, आता भाजपा सरकार त्या वृत्तीने वागत आहे. देशाच्या स्वायत्त संस्थावर हल्ले होत आहेत. कथित राजा कुणाचेही ऐकण्यास तयार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
देशात दरी पडत चालली आहे -
आपल्या देशात दोन भारत निर्माण झाले आहेत. एक भारत श्रीमंतांचा आणि दुसरा गरीबांचा आहे. सध्या या दोन भारतातील दरी वाढत चालली आहे. भारतातील तरुणांकडे रोजगार नाही. ही दरी आताच मिटवा, नाहीतर याचे परिणाम भयानक होतील.
लघू आणि मध्यम उद्योग नष्ट होतायं -
स्मॉल इंडियाशिवाय 'मेड इन इंडिया' होऊच शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. 'मेड इन इंडिया' करायचे असेल तर आधी लघू आणि मध्यम उद्योगांना पाठबळ द्यावे लागेल, असे ते म्हणाले.
2021 मध्ये 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या -
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीचा उल्लेखदेखील नव्हता. देशातील तरुण रोजगार मागत आहेत, पण सरकार रोजगार नाही. गेल्या एका वर्षात 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 2 गेल्या 50 वर्षात नव्हती, तेवढी बेरोजगारी देशात निर्माण झाली आहे, असे राहुल म्हणाले.
मोदींनी मोजक्या लोकांचे खिशे भरले -
मोदी सरकारने गरिबांकडून लाखो-करोडो रुपये हिसकावून घेत, ते काही मोजक्या लोकांना दिले आणि त्यांना भारतातील सर्वात मोठे अब्जाधीश बनवलं आहे. गेल्या काही वर्षांत लघु-मध्यम उद्योगांवर एकामागून एक हल्ले होत आहेत. नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोना काळात तुम्ही गरिबांना आधार दिला नाही. म्हणून आज भारतातील लोकांचे उत्पन्न 84 टक्क्यांनी घटले असून ते देश वेगाने गरिबीकडे वाटचाल करत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.
मोदी सरकारने 23 कोटी लोकांना गरिबीच्या खाईत लोटले -
भाषणादरम्यान भाजपा नेत्यांनी 60 वर्ष सत्तेचा मुद्दा उठवल्यानंतर त्यावर राहुल गांधींनी भाष्य केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या 60 वर्षांवर तुम्ही भाष्य करता, त्यावर मी बोलू इच्छितो, की आमच्या सरकारने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि तुम्ही 23 कोटी लोकांना पुन्हा गरिबीच्या खाईत लोटले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.
सर्व राज्यांना समान सन्मान हवा -
तामिळनाडूच्या लोकांना यूपी आणि इतर राज्यांप्रमाणेच प्राधान्य मिळायला हवे. मणिपूर, नागालँड, जम्मू आणि काश्मीरला समान प्राधान्य मिळायला हवे. ही एक गंभीर समस्या आहे, असे ते म्हणाले. देशाचा जो पाया आहे, त्या पायासोबतच आरएसएस आणि भाजपा यांनी खेळ चालवला आहे. देशाचे मुलभुत स्तंभ कमकुवत करण्यात येत आहेत, असे राहुल म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा -
गेल्या 31 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. काल म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यावर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा आणि राज्यसभा) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही सभागृहात चर्चेसाठी 12-12 तासांचा अवधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारीला लोकसभेत आणि 7 फेब्रुवारीला राज्यसभेत चर्चेला उत्तर देतील. भारतीय जनता पक्षाचे हरीश द्विवेदी बुधवारी म्हणजेच आज लोकसभेत आभारप्रस्ताव मांडला. तर तर पक्षाच्या गीता उर्फ चंद्रप्रभा या राज्यसभेत आभार प्रस्ताव मांडला. एकूण 12 तासांच्या चर्चेच्या वेळेपैकी 1 तास काँग्रेसला देण्यात आला आहे.
हेही वाचा - LIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन : लोकसभेतून थेट प्रक्षेपण, खा. राहुल गांधी यांचे भाषण