नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी सांगितलं की, भारतासोबत मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी अजून काही काही वेळ लागणार आहे. परंतु हा व्यापार करार "दूरदर्शी" तसंच "आधुनिक" करार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या कराराचा दोन्ही देशांना फायदा होईल असं देखील त्यांनी म्हटलं. दोन्ही देशात 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उदिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं.
भारतीय निर्यातदारांना कराराचा फायदा : एका विशेष मुलाखतीत सुनक म्हणाले की, व्यापार करारामुळं भारतीय निर्यातदारांना याचा फायदा होणार आहे. भारतातील जवळपास 48 दशलक्ष लघु तसंच मध्यम उद्योगांना या करारामुळं ब्रिटीश बाजारपेठेत प्रवेश मिळणार असल्याचं सुनक म्हणाले. 2030 पर्यंत यूके-भारत व्यापार दुप्पट करण्याचं आमचं उदिष्ट असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. एक आधुनिक, दूरदृष्टी असलेला मुक्त व्यापार करार आमच्या महत्त्वाकांक्षेच्या मार्गावर आम्हाला आणू शकतो," असं देखील मत सुनक यांनी व्यक्त केलयं.
व्यापारी संबंध वाढवण्याची संधी : "आमचे व्यापारी संबंध वाढवण्याची ही संधी मिळणं आमच्यासाठी खूप आनंददायी असल्याचं सुनक यांनी म्हटलं आहे. भारतानं मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी केलेला पहिला युरोपीय देश बनल्याचा देखील आनंद होत असल्याची भावना सुनक यांनी व्यक्त केलीय. भारत तसंच यूके सध्या एका महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत. ज्यामुळं दोन्ही देशांमधील आर्थिक देवाण-घेवाणीमुळं दोन्ही देशातील व्यापाराला चालना मिळणार आहे.
भारतासोबत एकत्रितपणे काम करू : पंतप्रधान सुनक यांनी "जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यापासून ते हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आम्ही G20 अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारतासोबत एकत्रितपणे काम करू, असं म्हटलंय. सुनक यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शेजारी देशावर हल्ला करण्याची परवानगी दिली तर त्याचे संपूर्ण जगावर भयंकर परिणाम होतील.
रशियाचा सार्वभौम देशावर हल्ला : जगातील दोन आघाडीच्या लोकशाही देशामध्ये आमची गणना होते. आमच्या लोकशाहीचा आदर्श घेत इतर देश आमच्याकडे आदरानं पहतात. त्यामुळं बेकायदेशीर रशियन आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनला पाठिंबा देण्यावर यूकेचा भर असल्याचं सुनक यांनी म्हटलं आहे. 'स्वतंत्र लोकशाही देश म्हणून युक्रेनला स्वतःचं भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. पुतीन यांना सार्वभौम देशावर हल्ला करण्याची परवानगी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जागाला भोगावे लागतील. "युक्रेनच्या नागरिकांशिवाय कोणालाही शांतता नको आहे. मात्र, पुतिन यांनी ठरवलं तर त्यांचं सैन्य मागे घेऊन युद्ध संपुष्ठात आणु शकतात असं, सुनक यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलयं.
हेही वाचा -