बिजनौर - जिल्ह्यातील केमिकल कारखान्यात स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना घडली. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मोहल्ला बक्शीवालामधील एका छोटेखानी कारखान्यात फटाक्यांचे उत्पादन होते. ही केमिकल कारखाना युसूफ नामक व्यक्तीचा आहे. कामादरम्यान अचानक स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागली. आगीने भीषण रूप धारण केले. यात पाच कामगारांचा जळून मृत्यू झाला. तर दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. कारखान्याचा मालक युसूफला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रोहतकमध्ये आग लागून रेल्वेच्या तीन बोग्या जळून खाक -
आज रोहतक रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. रेल्वेच्या तीन बोग्या जळून खाक झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतकहून दिल्लीकडे जाणाऱ्या ईएमयू रेल्वेला भीषण आग लागली होती. सुदैवाने, ही दुर्घटना घडली त्यावेळी रेल्वेमध्ये कोणतेही प्रवासी उपस्थित नव्हते. सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी ही गाडी रोहतकहून दिल्लीला जाणार होती.
हेही वाचा - सीबीआय चौकशी सुरूच राहणार, अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली