नवी दिल्ली - राज्यसभेत वित्त विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. पेट्रोल-डिझेल दराच्या बहाण्याने त्यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी राज्यसभेत उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटींची वसूली करत आहेत. त्यांनी आधी या 100 कोटींचा हिशोब द्यावा. तसेच डिझेल आणि पेट्रोलवर महाराष्ट्रात जास्त कर आकारला जातो. त्यामुळे तिथे जास्त किंमत असल्याचे सिंधिया म्हणाले.
पेट्रोल आणि डिझेलच्या करातून 64 टक्के हिस्सा हा राज्य सरकारला मिळतो. मग राज्य सरकार दर कमी का करत नाही? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची किंमत जास्त आहे. ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये, असे त्यांनी म्हटलं.
काँग्रेसकडून आर्थिक धोरणांवर कडक टीका -
काँग्रेसचे नेते दीपेंद्रसिंग हूडा यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडक टीका केली कोरोनापूर्वीही अर्थव्यवस्था रुळावर नव्हती. अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकार कोरोनाचा आधार घेत आहे. चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेला कोरोनात फटका बसला. पण परिस्थिती सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद केलेली नाही, असा आरोप हूडा यांनी केला.
कोरोनाच्या पहिल्या आठ तिमाहींमध्ये जीडीपी विकास दर 8 वरून 3 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात जीडीपीचा सरासरी विकास दर 7.8 टक्के होता. सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात जीडीपीचा सरासरी दर 6.8 टक्के आहे. मागील सरकारच्या काळात गुंतवणूकीचे दर जे 14 टक्के होते ते आता 2 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. त्याच वेळी बँकांकडील कर्जाचे दर 13 टक्क्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत घसरले. निर्यातीच्या बाबतीत या सरकारची कामगिरी अत्यंत खराब झाली असून हा दर 21 वरून 3 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे हुडा यांनी राज्यसभेत सांगितले.