नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ईशान्येकडील नेते सध्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी ईशान्येतील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या तीन राज्यांमध्ये फेब्रुवारी-मार्च दरम्यान मतदान होणार आहे.
'त्रिपुरात भाजपचीच सत्ता येणार' : सध्या त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आहे, तर भाजप मेघालय आणि नागालँडमधील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. 'आम्ही त्रिपुरामध्ये अतिशय प्रभावी ट्रॅक रेकॉर्डसह सत्ता कायम ठेवू. मला विश्वास आहे की त्रिपुरातील जनता पुन्हा आम्हालाच सरकार चालवण्याची जबाबदारी देईल,' असे पक्षाचे त्रिपुराचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्जी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. ते म्हणाले की, त्रिपुरामध्ये काँग्रेस आणि डाव्या आघाडीची कोणतीही संभाव्य युती चालणार नाही. 'लोकांना सीपीएम आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल माहिती आहे. राज्यात डावे पक्ष आणि काँग्रेसचे राज्य असताना राज्यातील जनतेचा विश्वासघात झाला,' असे भट्टाचार्जी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या राजवटीची धोरणे लोकाभिमुख आहेत.
'मेघालयमध्ये सरकार स्थापन करण्याचा विश्वास' : त्रिपुरा विधानसभेत 60 जागा असून त्यापैकी 20 जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 36 जागा जिंकल्या होत्या, इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) ने 8 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने (CPM) 16 जागा जिंकल्या होत्या. भाजपचे मेघालय अध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनी देखील पक्ष यावेळी राज्यात निश्चितपणे सरकार स्थापन करेल, असे म्हटले आहे. 'आम्हाला मेघालयमध्ये सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. केंद्र सरकारच्या सकारात्मक कामगिरीमुळे आम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्कीच प्लस पॉइंट मिळेल,' असे मावरी म्हणाले. या वेळी पक्ष निवडणुकीत एकटाच उतरेल असे विचारले असता ते म्हणाले की, मागील निवडणुकीनंतरची युती कायम राहण्याची शक्यता आहे.
मेघालयात तृणमूल सक्रीय : मेघालयात 60 सदस्यीय विधानसभेत कॉनरॅड समग्मा यांच्या NPP कडे 20 जागा, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) कडे आठ, भाजपकडे तीन आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (PDF) कडे दोन जागा आहेत. विरोधी पक्ष ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कडे आठ आणि राष्ट्रवादीकडे 1 जागा आहे. सध्या 18 जागा रिक्त आहेत. मेघालयमध्ये या वेळी पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी या महिन्यात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तयार असल्याने टीएमसी अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे.
नागालँडमध्ये 20:40 चा फॉर्मुला : नागालँडमध्ये भाजपने नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) सोबत 20:40 जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्येही 60 जागा आहेत. एनडीपीपीचे अध्यक्ष चिंगवांग कोन्याक म्हणाले की, जागावाटप आधीच निश्चित झाले आहे. 'आम्ही नागालँडमध्ये 40:20 जागावाटपाच्या आधारावर विधानसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. भाजप 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीत जागा निश्चित केल्या जातील,' असे ते म्हणाले. नॅशनल पीपल्स फ्रंट (NPF) कडे 26, एनडीपी 18, भाजप 12, NPP कडे दोन, जेडीयू एक आणि अपक्ष एक जागा आहे. नागालँडमध्ये कोणताही विरोधी पक्ष नाही कारण सर्व एनपीएफ एनडीपीपी च्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक अलायन्स (UDA) मध्ये सामील झाले आहेत.
हेही वाचा : J P Nadda tenure extend भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांना मुदतवाढ, अमित शाहांनी दिली माहिती