इंदूर - मध्य प्रदेशातील प्रसिद्ध राष्ट्रसंत भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी ( Bhayyu Maharaj suicide case ) इंदूर कोर्टात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने विनायक, चालक शरद आणि पलक पुराणिक ( Palak Puranik convicted Bhaiyyu Maharaj suicide case ) यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की, भैय्यू महाराज यांचा सेवकांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केली. दोषींना 6-6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सर्वांना 6-6 वर्षांची शिक्षा -
सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या पलक पुराणिक (२८), विनायक दुधाडे (४५) आणि शरद देशमुख (३७) यांना भारतीय दंड संहिता कलम १२०-बी (गुन्हेगारी कट), कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ३८४ (खंडणी) अन्वये दोषी ठरवून ही दोषींना 6-6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण -
भय्यू महाराज (50) यांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील बायपास रोडवरील त्यांच्या बंगल्यावर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या खळबळजनक घटनेनंतर सात महिन्यांनी पोलिसांनी पलक पुराणिक यांच्यासह भैय्यू महाराज यांचे विश्वासू सहकारी विनायक दुधाडे आणि शरद देशमुख यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक कथितपणे भैय्यू महाराज यांच्यावर आक्षेपार्ह गप्पा आणि इतर वैयक्तिक गोष्टींद्वारे लग्नासाठी दबाव आणत होती. यातून त्यांनी आत्महत्या केली होती.
'म्हणून त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले'
मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्ष सुनावणी झाल्यानंतर सत्र न्यायालयाने आज (शुक्रवार) हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे सेवेदार होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेदारांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले, असे आदेशात म्हटले आहे.
साडेपाच तास चालली सुनावणी -
याप्रकरणी १९ जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यात भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल २८ जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.