नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत दारूची दुकानेही बंद असल्याने तळीरामांची मोठी आफत झाली. दारूची दुकाने उघडण्याचे आदेश दिल्यानंतर दारूच्या दुकानासमोर लांबच्या लांब रांगा लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडाला. हे लक्षात घेता ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या झोमॅटो दारूची होम डिलिव्हरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला (आयएसडब्ल्यूएआय) प्रस्ताव दिला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये दिलेल्या माहितीनुसार 4 मे पासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला. या तिसऱ्या टप्प्यामध्ये रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन या तिन्ही झोनमध्ये दारूची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तळीरामांनी दुकानावर तोबा गर्दी केल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली आणि मद्यपींच्या पदरी निराशा पडली. आता झोमॅटो दारूची होम डिलिव्हरी करणार असल्याने तळीरामांचा प्रश्न मिटला आहे.