बिष्णूपूर - 'तुम्ही भाजप बाबू 'जय श्री राम' म्हणता, आजपर्यंत एक तरी राम मंदिर बांधले आहे का? केवळ 'जय श्री राम' म्हणून गाण्यातच सगळा वेळ घालवला. निवडणुका आल्या की रामचंद्र तुमच्या पक्षाचे 'एजंट' बनतात. तुम्ही स्वतः 'जय श्री राम' म्हणता आणि इतरांना म्हणण्यास भाग पाडता,' असे आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. त्या येथे सभेला संबोधित करत होत्या.
पंतप्रधान मोदींनी झारग्राम येथील सभेत भगवान राम यांना गाणे गाऊन आवाहन केले होते. त्यानंतर ममतांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हान दिले होते. ममता यांनी 'जय श्री राम' म्हणणाऱ्या भाजप समर्थकांना अटक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप समर्थक मुख्यमंत्री ममता यांच्यासह जाणाऱ्या गाड्यांच्या जथ्थ्यासमोर 'जय श्री राम' म्हणत घोषणा देत होते. तेव्हा गाडीतून खाली उतरून ममता त्यांच्यावर खेकसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्या या घोषणा म्हणजे 'शिव्या' आहेत, असेही म्हणताना दिसतात. यानंतर मोदींनी जय श्री राम म्हणत आपल्यालाही तुरुंगात टाकण्याचे आव्हान ममता यांना दिले होते.