नवी दिल्ली - नागिरकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी पोलीस चौकी आणि वाहने पेटवून दिली. ज्यांनी तोडफोड केली त्यांची संपत्ती जप्त करणार असल्याचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावले आहे.
राज्यातील परिस्थितीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेतली. आंदोलनाच्या नावावर हिंसा करणे चुकीचे आहे. ज्या लोकांनी आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड केली आहे. त्या दोषींवर कारवाई केली जाणार असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.
लखनौमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना पांगवले. यावेळी आंदोलकांनी वाहनांना आग लावली तसेच मदेयगंज आणि सतखंडा पोलीस चौकी पेटवून दिली.
हेही वाचा - लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार, आंदोलकांनी पोलीस चौकीला लावली आग
उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारामध्ये तीन आंदोलकांना गोळी लागली असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोघांची हालत गंभीर आहे. दरम्यान, शहरातील परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचे पोलिसांनी सांगतिले.
हेही वाचा - 'सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही', राहुल गांधींची टीका