पुणे - स्वित्झर्लंड येथील दावोस येथे येत्या २० ते २४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूईएफ) च्या वार्षिक बैठकीत बारामती हबच्या सदस्या असलेल्या तसंच तरुण उद्योजिका आणि ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या देवयानी पवार यांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या जगभरातील ५० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासाठी निवडलेल्या २ भारतीयांपैकी देवयानी पवार या एक आहेत.
देवयानी पवार यांची कशी झाली निवड - बारामतीमध्ये सातत्याने सामाजिक, नैसर्गिक आणि हवामान बदल, आरोग्यसेवांविषयक जागरूकता, पुनर्वापर अशा विषयातील सातत्यपूर्ण तसंच उत्कृष्ट कामासाठी कार्यरत असलेल्या देवयानी पवार यांची जगभरातील ६०० अर्जदारांमधून या परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक उपक्रम असून या अंतर्गत जगभरातील युवक हे आपापल्या भागातील स्थानिक, प्रादेशिक याबरोबरच जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात.
...या निमित्ताने मोठी संधी - याबाबत देवयानी पवार म्हणाल्या, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी ही मी माझा सन्मान समजते. दावोसच्या या भेटीमध्ये मला जागतिक नेत्यांसोबतच सकारात्मक काम करत समाजात बदल घडवणाऱ्या अनेकांना भेटण्याची आणि त्यांसोबत नेटवर्किंग करण्याची संधी मिळेल." याबरोबरच या परिषदे दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक असलेले क्लॉस श्वाब यांसोबत होणाऱ्या एका विशेष सत्रासाठी देखील उत्सुक असून या व्यासपीठाचा उपयोग स्थानिक पातळीवर भारतासाठी आणि सहकारी हब्ससाठी नव्या कल्पना आणि प्रगतीशील उपक्रम राबवण्यासाठी मी करणार असल्याचंही यावेळी देवयानी पवार यांनी सांगितलं.
देवयानी पवार यांचं कौतुक - दरवर्षी जानेवारी महिन्यात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूईएफ)ची वार्षिक बैठक आयोजित करण्यात येत असते. जागतिक व्यवसाय, विविध देशांतील सरकारं, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचे गट सध्याच्या काळातील गंभीर समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी विविध मान्यवर तसंच ज्यांची निवड करण्यात येत असते ते एकत्र येतात. यंदाच्या या बैठकीत देवयानी पवार यांची निवड करण्यात आल्यानं सर्वत्र देवयानी पवार यांचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
देवयानी पवार यांचं कार्य - देवयानी यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये बारामतीजवळील जंगलामध्ये वनविभागाच्या मदतीनं ४ हजारहून अधिक देशी वृक्षांची लागवड करणे, बारामती विभागाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये महिला आणि मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करणे, ५०० हून अधिक ग्रामीण महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान आवश्यक स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबविणे, ग्रामीण पार्श्वभूमीच्या ४ हजारांहून अधिक तरुणांना कौशल्याधारीत प्रशिक्षण देणे याबरोबरच कौशल्य विकास, कचरा व्यवस्थापन, रक्तदान मोहीम, मानसिक आरोग्यबद्दल जनजागृती, वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरवणे अशा उपक्रमांचा समावेश आहे.
हेही वाचा..