बीड : मागील काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना बीडच्या आष्टी तालुक्यात गुरुवारी रात्री दुहेरी हत्याकांड घडलं. या हल्लात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या दोन घटना ताज्या असताना आता बीडच्या गुन्हेगारी विश्वातून आणखी एक घटना समोर आलीय.
युवकाने घरासमोर केला गोळीबार : अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील माऊली नगर येथे राहणाऱ्या नवनाथ कदम यांच्या घरासमोर रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार केला. यामुळं परिसरात दहशत निर्माण झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, मात्र शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मुलावर केला गोळीबार : गणेश पंडित चव्हाण याचा कदम यांच्या पत्नी शेश्या कदम यांच्याशी कौटुंबिक वाद सुरू होता. मागील काही दिवसांपासून तो सतत धमक्या देत होता. याबाबत कदम कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आज सकाळी चव्हाण कदम यांच्या घरी आला आणि वाद घालत त्यांच्या मुलावर गोळीबार केला. सुदैवाने गोळी मुलाला गोळी लागली नाही, त्यामुळं मोठा अनर्थ टळला. गोळी झाडण्यासाठी चव्हाण याने गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्याकडं शस्त्र परवाना नसल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं असून, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे तपास करत आहेत. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
जिल्ह्यात किती पिस्तुल धारक? : बीड जिल्ह्यात 1289 पिस्तुल धारक यांना परवानगी असल्यानं अनेक जण हवेत गोळीबार करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अनेक पिस्तुल धारकांचे लायसन देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळं पिस्तुल बाळगणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने एकच वचक ठेवला आहे.
हेही वाचा -