नीमच (मध्यप्रदेश) - मोदीजी पावसामुळे लढाऊ विमाने रडारवरून गायब होतात का? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केला. एअर स्ट्राईक करत असताना भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी ढगाळ वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञांना दिल्याचे मोदी म्हणाले होते. यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रडारबाबत सवाल केला आहे.
मोदीजी तुम्ही आंबे खायचे शिकवले, कुर्ता कसा घालायचा हे शिकवले आता आम्हाला सांगा तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात युवकांना रोजगार देण्यासाठी तुम्ही काय केले, असा सवालही राहूल गांधी यांनी सभेत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राईक दरम्यान तज्ज्ञांना ढगाळ वातावरण असल्याने मोहीम रद्द करण्यात येऊ नये, असा सल्ला दिल्याचे सांगितले होते. 'हल्ल्यापूर्वीचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता’ अशा प्रकारचे विधान मोदींनी केले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.