तिरुवनंतपुरम - नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. यात केरळमधील एका अंध तरुणाचा समावेश आहे. 23 वर्षीय तरुणाने अंधत्वावर मात करत, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्रीय स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले आहे. गोकुळ एस. असे तरुणाचे नाव असून तो तिरुवनंतपुरम येथील रहिवासी आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्याने 804 क्रमांक मिळविला आहे. गोकुळ बालपणापासूनच शिक्षणशास्त्र आणि अभ्यासात चांगला आहे. सध्या गोकुळ इंग्रजी भाषा व साहित्यात पीएचडी करीत आहे. गोकुळला दृष्टिहीन लोकांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी काम करण्याची इच्छा आहे.
गोकुळचे वडील सुरेश कुमार हे एनसीसी संचालनालयाचे अधिकारी असून आई शिक्षक आहे. दोघेही आपल्या मुलाच्या यशाने भारावून गेले आहेत. सेवेमध्ये गोकुळचे पहिले प्राधान्य भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ला आहे. त्याची दुसरी पसंती भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आहे.
यूपीएससी परीक्षा म्हणजे काय?
यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेमार्फत आयएएस, आयपीएस, आयएफएस इत्यादी देशाच्या प्रतिष्ठित सेवांसाठी निवड केली जाते. याव्यतिरिक्त भारतीय रेल्वे खाते सेवाअंतर्गत रेल्वे गट ए आणि भारतीय टपाल सेवेसह काही इतर सर्विसेससाठीही देशभरातून उमेदवारांची निवड केली जाते. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते.