चेन्नई - सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. तामिळनाडूतील एका गावात डायनासोरची अंडी सापडल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या अंड्यांकडे लोक कुतूहलाने पाहत आहेत. अनेकांनी तर थेट संबंधित गाव गाठले आणि डायनासोरची अंडी पाहिली. मात्र, पुरातत्व विभागाला माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर या व्हायरल फोटोमागील सत्य बाहेर आले.
पेरंमबलूर जिल्ह्यातील कन्नान गावातील व्हायरल फोटो
पेरंमबलूर जिल्ह्यातील कन्नाम गावातील हा व्हायरल फोटो आहे. विशेष म्हणजे पेरंमबलूर जिल्ह्यात याआधीही पुरातन वस्तू सापडल्याने ही डायनॉसोरची अंडी असावी, असा अंदाज बांधून काहींनी हे फोटो व्हायरल केले. डायनासोरची अंडी सापडल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली. शास्त्रज्ञांनी जेव्हा अंड्यांसारख्या दिसणाऱ्या या गोळ्यांचा अभ्यास केला तेव्हा मात्र, वेगळीच माहिती समोर आली.
पुरातत्व शास्त्रज्ञांनी घेतला शोध
मोठ्या अंड्यांसारखे दिसणारे हे पांढरे गोळे डायनासोरची अंडी नसून अमोनियम नायट्रेटचे गोळे आहेत. लाखो वर्षांपूर्वीच्या समुद्रातील जीवांचे हे अवशेष आहेत. समुद्रातील मोलुस्का प्रजातीतील मृत प्राण्यांचे हे अवशेष सुमारे ४१ लाख वर्षांपूर्वीचे आहेत. असे एकूण पांढऱ्या दगडांचे २५ गोळे गावात सापडले.
शेतात सापडल्या होत्या पुरातन मूर्ती
या गावात पुरातन अवशेष सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असे शास्त्रज्ञांच्या पथकाने सांगितले. याआधी एका शेतकऱ्याला शेतात झाडे लावण्यासाठी खड्डे खोदत असताना कांस्य धातूच्या ५ मूर्ती सापडल्या होत्या. या शेतकऱ्याने भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली होती. त्यानंतर मूर्ती पुरातत्वविभागाकडे जमा करण्यात आली होती. मात्र, आता डायनासोरच्या अंड्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून यामागील सत्य काहीतरी वेगळे असल्याचे समोर आले आहे.