नवी दिल्ली - उत्तरप्रदेशातील महोबामध्ये अजनार पोलीस ठाण्यावार स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. विजपुरवठा सुरळीत करत असणाऱया कनिष्ठ अभियंत्यास शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीस अटक केल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याची माहिती आहे.
गेल्या चार दिवसांपासून चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता वीजपूरवठा सुरळीत करण्याचे कार्य करत होता. मात्र, गावातील एका व्यक्तीने कनिष्ठ अभियंत्यास शिवीगाळ देण्यास सुरवात केली. हे कळताच पोलिसांनी संबधीत व्यक्तीला अटक केले आणि पोलीस ठाण्यात आणले, असे महोबाचे पोलीस अधीक्षक मनिलाल पाटीदार यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर ग्रामस्थांनी आरडाओरड करत पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. तसेच पोलीस ठाण्याजवळ उपस्थित असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आल्याचे पाटीदार यांनी सांगितले.
दरम्यान या दगडफेकीत कनिष्ठ अभियंता व दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे पाटीदार यांनी सांगितले