लखनऊ - उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्येच आत्महत्या केली आहे. शामली जिल्हा पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षांच्या या रुग्णाने स्वतः ला कक्षाच्या छताला लटकवून घेतले होते. त्याने ही आत्महत्या कोरोनाच्या भीतीमुळे केली, की आणखी काही कारणामुळे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे, असे पोलिसांनी सांगितले.
शामली जिल्हा दंडाधिकारी जसजीत कौर यांनी सांगितले, की मंगळवारी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्याने आत्महत्या केली. तसेच, या व्यक्तीच्या नमुन्यांचे कोरोनासाठीचे चाचणी अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती दंडाधिकाऱ्यांनी दिली.
उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ११७ रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा : तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाला जाणाऱया 400 जणांना कोरोनाची लागण