नवी दिल्ली - डेल आणि माईंडट्री या आयटी कंपन्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपन्यांनी आज ही माहिती दिली. यापैकी डेल कंपनीचा कर्मचारी हा अमेरिकेहून परतला होता. तर, माईंडट्रीचा कर्मचारीही परदेशवारी करून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
डेल इंडियाचे दोन कर्मचारी हे टेक्सासमधील आमच्या मुख्यालयाला भेट देऊन परतले होते. कोरोना विषाणूबाबत त्यांची तपासणी केली असता, त्यांपैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह, तर दुसऱ्याचा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती कंपनीने दिली. यासोबतच, कंपनीतील बाकी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही खबरदारी घेत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
तर, माईंडट्रीच्या कर्मचाऱ्याला १० मार्चला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या कर्मचाऱ्यासोबतच त्याचे सहकारी आणि कुटुंबीयांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली. या कर्मचाऱ्याने खबरदारी बाळगत परदेशातून परतल्यानंतर स्वतःच इतरांशी संपर्क करणे टाळले होते, असेही कंपनीने सांगितले.
हेही वाचा : दुबईहुन परतलेल्या कोरोना संशयिताचा कर्नाटकात मृत्यू