नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३९ हजार ९८० झाली असून यातील २८ हजार ०४६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आत्तापर्यंत १० हजार ६३३ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. देशभरामध्ये १ हजार ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने RT-PCR पद्धतीने दहा लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्याचे सांगितले आहे. मागील २ दिवसांत ७० हजारांपेक्षा जास्त चाचण्या आयसीएमआरने केल्या आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानने सर्वात जास्त चाचण्या घेत असून आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकने आणखी चाचण्या घेण्याची गरज असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मागील २४ तासांत देशभरात 2 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. एकूण रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या जवळ आला आहे. ४ मे पासून देशात पुन्हा २ आठवड्यांनी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशातील जिल्ह्याचे ग्रीन, ऑरेंज, आणि रेड झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार परिसरात बंधने लागू राहणार आहेत.
कोरोनाशी लढणाऱ्या सर्व योद्ध्यांना आज देशाच्या वायुसेनेकडून मानवंदना दिली जात आहे. वायुसेनेकडून रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि इतर सर्वजण जे कोरोनाच्या लढाईत आघाडीवर आहेत त्यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात येत आहे.