चंदीगढ : शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, ही केवळ शेतकऱ्यांना भुलवण्यासाठी असलेली खेळी असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. शिरोमणी अकाली दल वर्षानुवर्षे अशा युक्त्या वापरत आल्याचेही ते यावेळी म्हणाले.
राजीनामा देण्यासारख्या युक्त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना फसवण्याची शिरोमणी अकाली दलाची चाल आहे. ही चाल यशस्वी होणार नाही, कारण केंद्रात अकाली दल एनडीए सरकारमध्ये भाजपसोबतच आहे, हे सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांनाही माहिती आहे. हरसिमरत यांचा राजीनामा देण्याचा निर्णय हा खूपच उशीरा घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. यापूर्वीच त्यांनी या विधेयकाविरोधात आवाज उठवला असता, तर कदाचित हे विधेयक मंजूरही झाले नसते, असे ते म्हणाले.
आताही शिरोमणी अकाली दलाने कौर यांच्या राजीनाम्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नाही, तर स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णय घेतला आहे. बादल यांची पंजाबच्या शेतकऱ्यांमध्ये असणारी विश्वासार्हता संपली आहे. ती परत मिळवण्यासाठीच अशा चालींचा वापर केला जातो आहे, असे सिंग म्हणाले.
राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा..
दरम्यान, गुरुवारी मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांच्या निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. याआधी त्यांचे पती शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत त्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा केली. आज राष्ट्रपतींनी कौर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.