नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखिन एक झटका बसला आहे. बंगालमधील अलिपूरव्दार जिल्ह्यातील कालचीनी येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार विल्सन चंपामरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विल्सन यांच्यासोबत १८ नगरसेवकांनीही बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष, कैलास विजयवर्गीय आणि मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि नगरसेवकांचा भाजप प्रवेशाचा ओघ अजूनही थांबला नाही. याआधीही बंगालमधील तृणमूलचे ३ आमदार आणि ६० पेक्षा अधिक नगरसेवकांनी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यासोबतच प्रमुख मुस्लिम नेते मोनिरुल इस्लाम आणि बीरभूम जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमधील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. भाजपने लोकसभेत चांगली कामगिरी करताना ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. २०१४ मध्ये भाजपचे केवळ २ खासदार बंगालमधून निवडुन आले होते. परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप-तृणमूलमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळत आहे.