बंगळुरु (कर्नाटक) - सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब कुटुंबाना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबाच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. याचप्रमाणे बंगळुरु येथील एक कुटुंब ३०० निराधार लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. लॉकडाऊनदरम्यान ज्या लोकांचे भुकेमुळे हाल होत आहेत, अशा लोकांसाठी हे कुटुंब आधार बनले आहे.
बृहत बंगळुरु महानगरपालीकेअंतर्गत येणाऱ्या प्रशासकीय कार्यालयात काम करणारा जॉन नामक व्यक्ती आणि त्याचे कुटुंब निराधार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावले आहे.
घरी परतत असताना जॉन यांना मॅजेस्टिक बसस्थानकाजवळ काही लोकांनी अन्नासाठी याचिका केली होती. यासंबंधी त्यांनी घरी आल्यानंतर आपल्या पत्नीशी चर्चा केली. त्यानंतर आम्ही दोघांनीही अशा निराधार लोकांना अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला, असे जॉन यांनी सांगितले.
याबाबत पुढे सांगताना ते म्हणाले, की 'सुरुवातीला आम्ही ५० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. मात्र, जसजशी इतर लोकांना याबाबत माहिती मिळत गेली, तशी आमच्या स्टॉलवर येणाऱ्या लोकांची संख्या वाढत होती. जेव्हा आम्ही नुकतीच अन्नपुरवठा करण्यास सुरुवात केली तेव्हा काही वेळातच अन्नाशिवाय राहणाऱ्या लोकांनी आमच्याजवळ मोठ्या गर्दी केली. त्यामुळे अधिकाधिक गरजु लोकांना जेवण पुरवठा करण्याचा निर्णय घेतला'. आता आम्ही ३०० पेक्षा अधिक निराधारांच्या जेवणाची व्यवस्था करू शकत आहोत, असेही ते म्हणाले.

यासंबधी ईटीव्ही भारतशी बोलताना जॉन यांच्या पत्नीने सांगितले, की 'देवाने आम्हाला माणसांची सेवा करण्याची ही संधी दिली आहे. आमचे उत्पन्न जरी कमी असेल, तरीही आम्ही शक्य त्या पद्धतीने ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. भूकेला कोणताही धर्म नाही. त्यामुळे भुकेलेल्यांना जेवण देणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे', असे त्या म्हणाल्या.