हैदराबाद - देशभरात कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत असून देशात 1 हजारपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 27 लोकांचा बळी गेला आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी येत्या 7 एप्रिलपर्यंत तेलंगाणा कोरोनामुक्त होईल, असा दावा केला आहे.
सध्या तेलंगणात कोरोनाचे एकूण 70 रुग्ण आढळले असून 11 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्चही देण्यात येईल. जगातील विविध भागांतून एकूण 25 हजार 937 लोक आले असून त्यांना सरकारी देखरेखीखाली ठेवले गेले. या सर्व लोकांचा विलगणीकरणाचा कालावधी 7 एप्रिलला संपत आहे. या काळात जर नवीन प्रकरण नोंदवले गेले नाही तर 7 एप्रिलनंतर राज्यात कोरोनाचे एकही प्रकरण आढळणार नाही, असे ते म्हणाले.
या जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तेलंगाणा सरकार पूर्ण जोमाने तोंड देत आहे. नियमांचे उल्लघंन आणि अफवा पसरवणाऱ्यावर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. परराज्यातून कामावर आलेल्यांना कुटुंबाना 500 रुपये आणि 10 किलो राशन देण्यात येईल. परप्रांतीयांची आम्ही कुटुंबाप्रमाणे काळजी घेऊ त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी नागिरकांना कर्फ्यूचे पालन केले नाही तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा दिला होता. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंतही नाईट कर्फ्यू लागू केला आहे.