हैदराबाद - निझामुद्दीन परिसरात 'तबलिगी-ए-जमात' हा धार्मिक कार्यक्रम कोरोनाच्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. तबलिगी कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती लपवल्याबद्दल कोरोनाची लागण असलेल्या एका अधिकाऱ्यांविरोधात तेलंगाणा राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे.
संबधीत अधिकाऱयावर शहरातील गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधीत अधिकारी हा जनगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये (डीआरडीए) कार्यरत आहे. 15 मार्चला परवानगी आणि रजा न घेता त्यांने दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. 3 दिवसांनी परत आल्यानंतर कुठल्याच प्रकारची सावधगिरी न बाळगता सार्वजनिक ठिकाणी फिरला तसेच कामावर रुजू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्लीतील निजामुद्दीन भागातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तींनी आपणहून पुढे यावे, त्यांना कोणी काहीही बोलणार नाही, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यांच्यावर विनाशुल्क उपचार केले जातील, असे आवाहन तेलंगणा सरकारने केले आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथके तयार केली असून ही पथकं दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
राजधानी दिल्लीत पार पडलेल्या तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यासंबधी 1 हजार 23 रूग्ण आढळून आले आहेत. एकूण रूग्णांपैकी 30 टक्के रूग्ण तबलिगी संबधीशी निगडीत आहेत. तबलिगी कार्यक्रमाशी संबधीत रूग्ण 17 राज्यांमध्ये आढळून आले आहेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकऱणी अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणारे मौलाना साद यांचाही समावेश आहे.