नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्येही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तबलिगी जमातीने देशामध्ये कोरोना विषाणू पसरवून आत्मघाती हल्ल्याची योजना आखली होती, असा आरोप उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी केला आहे.
तबलिगी जमातीने हा विषाणू पसरवून एक लाखाहून अधिक लोकांना मारण्याची योजना आखली होती. मोदी सरकारला त्रास देण्यासाठी ही योजना आखली गेली होती. हा कट प्रत्यक्षात पंतप्रधानांविरूद्ध करण्यात आला होता, असे रिझवी म्हणाले.
तबलिगी जमातीच्या सदस्यांनी वैद्यकीय कर्मचार्यांना शिवीगाळ केली. जेणेकरुन, वैद्यकीय बंधूची बदनामी होईल आणि कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करणे थांबवले जाईल. हे देशाविरूद्धचे षडयंत्र आहे. त्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी, असेही रिझवी म्हणाले.
भारतातील कोरोना साथीच्या आजारामुळे 5 हजार 700 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.