नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना आपल्या वक्तव्यावर विचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे.
दरम्यान, आपल्याला वेळ देऊ नये, मला वेळ दिल्यास न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया जाईल. मी माझे वक्तव्य बदलेल, ही शक्यता कमी आहे, असे प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे. तर अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती न्यायालयाकडे केली.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आपल्याला दोषी ठरवल्याने मनाला ठेस पोहचली. लोकशाहीमध्ये खुली टीका ही संविधानीक अनुशासन स्थापित करण्यासाठी आहे. माझे टि्वट हे फक्त एक सामान्य नागरिकाने आपली जबाबदारी पाळण्यासाठी केलेला प्रयत्न होता, असे सुनावणीदरम्यान प्रशांत भूषण म्हणाले. तसेच त्यांनी न्यायालयाची माफी मागण्यासही नकार दिला. दरम्यान, पुनर्विचार याचिकेवर निर्णय दिल्यानंतर भूषण यांना शिक्षा दिली जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायधीशांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 14 ऑगस्टला दोषी ठरवले होते. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीस 6 महिने तुरुंगवास किंवा 2 हजार रुपये दंड दिला जातो. काही प्रकरणात दोन्हीही शिक्षा दिली जाते.