देहरादून - देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या आठवणी आजही त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात ताज्या आहेत. आपल्या वीर पुत्राची आठवण आली, की आजही त्यांचे डोळे पाण्याने डबडबतात. गोरखा रेजीमेंटमध्ये तैनात असलेल्या प्रवीण थापा यांनी वयाच्या केवळ 22 व्या वर्षी देशासाठी वीरमरण पत्करले आणि मागे सोडली एक डायरी आणि काही आठवणी. हुतात्मा प्रवीण यांचे वडील टीका राम थापा यांना जेव्हा त्यांच्या, या वीर पुत्राची आठवण येते, तेव्हा ते ती डायरी हृदयाशी लावून घट्ट पकडून बसतात.
6/8 गोरखा रेजिमेंटमध्ये 3 वर्षांची सेवा दिलेले प्रवीण थापा 11 सप्टेंबर 1998 रोजी हुतात्मा झाले. देहरादूनच्या संतोषगड संतला देवी मंदिर मार्गावरील झाडीवालामध्ये हुतात्मा प्रवीण यांचे कुटुंब राहते. ते आजही प्रवीण यांच्या आठवणीत जगत आहेत.
ईटीव्ही भारतसोबत बोलताना प्रवीन यांचे वडील म्हणाले, जेव्हा प्रवीणची आठवण येते तेव्हा मनसोक्त रडतो. प्रवीणची डायरी पाहून त्याची अत्यंत आठवण येते. एवढ्या कमी वयात मुलगा गमावल्याच्या वेदना आहेतच. पण, देशासाठी बलिदान करणाऱ्या मुलाचा अभिमानही वाटतो.
उत्तराखंड सरकारच्या वतीने कार्गिल दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाला आपल्याला बोलावले जाते का, असे विचारले असता टीका राम यांनी नाही म्हणत खंतही व्यक्त केली.