उन्नाव - हैदराबादमध्ये पशुवैद्य तरुणीला बलात्कार करून तिची हत्या करून जाळण्यात आले होते. या घटनेनंतर उन्नावमध्ये एका पीडितेला जिवंत जाळण्याची घटना घडली. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात कार्डिअॅक अरेस्टमुळे तिने अखेरचा श्वास घेतला आहे.
पीडितेवर काही महिन्यांपूर्वी बलात्कार झाला होता. त्यावर तिने मार्च महिन्यात दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र आरोपी जामीनावर सुटून बाहेर आले. गुन्हा दाखल केल्याने आरोपींच्या मनात राग होता. त्याच रागातून त्यांनी पीडितेला मारण्याचा कट रचला.
आरोपींची नावे...
या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम त्रिवेदी, शिवम त्रिवेदी, हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर वाजपेयी आणि उमेश वाजपेयी अशी आरोपींची नावे आहेत.
हत्येचा कट...
बलात्कार खटल्यासंदर्भातील कामासाठी पीडिता रायबरेलीला निघाली होती. यावेळी त्या दोन आरोपींसह 5 जणांनी पीडितेला रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पीडिता 90 टक्के भाजली होती. तिला पेटवून दिल्यानंतर आरोपी फरार झाले. बिहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली.
पिडितेचा अखेरचा श्वास...
तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेला सुरुवातीला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर तिची गंभीर स्थिती पाहता तिला तेथून विमानाद्वारे तत्काळ दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गुरुवारी रात्री 11.40 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली.