नवी दिल्ली : शहरातील ५६ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्याची माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी जाहीर केली. सेरो सर्वेक्षणातून ही बाब समोर आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी जैन यांनी सांगितले, की नैऋत्य दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.१८ टक्के लोकांमध्ये सेरोप्रिव्हलेन्स आढळून आले, जे शहरात सर्वाधिक होते. तर, उत्तर दिल्लीमध्ये ४९.०९ टक्के सेरोप्रिव्हलेन्स आढळून आले, जे शहरात सर्वात कमी होते.
पाचवे आणि सर्वात मोठे सर्वेक्षण..
या सर्वेक्षणासाठी दिल्लीच्या विविध जिल्ह्यांमधून एकूण २८ हजार लोकांचे नमुने गोळा करण्यात आले होते. १५ ते २३ जानेवारीदरम्यान हे सर्वेक्षण पार पडले. आज याचा अहवाल जाहीर करण्यात आला. दिल्लीमधील हा पाचवा सेरो सर्व्हे होता. जून-जूलै महिन्यामध्ये दिल्लीत पहिले सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये २३.४ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या होत्या. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमध्ये अनुक्रमे २९.१, २५.१ आणि २५.५ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या होत्या.
हेही वाचा : यूजीसी-नेटच्या तारखा जाहीर; २ ते १७ मे दरम्यान होणार परीक्षा