नवी दिल्ली - गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांचा राजकारणात सुळसुळाट वाढला आहे. मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल असलेला गुन्हेगार भारतीय रिपब्लिकन पक्षाचा (आरपीआय) सदस्य झाला आहे. दिल्ली पोलिसांना विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी अब्दुल नासिर आरपीआय दिल्ली प्रभागाचा युवाध्यक्ष बनला आहे. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात नासिरला युवाध्यक्ष करण्यात आले.
अब्दुल नासिरवर खून, लुटमार, हप्तावसूली यांसारख्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहेत. ९ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्या मंजुरीनंतर नासिरवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच नासिरची टोळी दिल्लीमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे.
अट्टल गुन्हेगाराला आता आरपीआयने आपल्या पक्षात सामावून घेतले आहे. १८ जुलै रोजी झालेल्या एका कार्यक्रमात रामदास आठवलेच्या समक्ष त्याने पक्षप्रवेश केला. तसेच त्याला दिल्लीचा युवाध्यक्ष पद बहाल केले. नासिरवर अनेक गुन्हे दाखल असून राजकारणात प्रवेश करुन तो यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नासिर तीन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला आहे. तो दिल्लीतील टोळी युद्धात सहभागी असून छेनू पहलवान या गुंडाशी त्याचे टोळी युद्ध सुरु आहे.