मधुबनी (बिहार) - दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन देणारे स्वत: बेरोजगार आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लोहा शाळेच्या मैदानावर बेनीपट्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार विनोद नारायण झा यांच्या समर्थनार्थ एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि भाजपाचे खासदार रवि किशन आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबोधित केले. दोघांनी महाआघाडीवर जोरदार टीका केली.
- काय म्हणाले रवि किशन -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली तर चीनला आपल्या पायाखाली रगडले. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने 15 वर्षांपूर्वी जे जंगलराज होते ते संपवले. गुन्हेगारी वृत्ती त्यांनी संपवली आहे. मधुबनीमधून आता सर्व गुन्हे संपतील, कारण नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सरकार येणार आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार विनोद नारायण झा यांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
तर याबरोबरच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीदेखील विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, राज्याच्या विकासासाठी डबल इंजिनच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन करणे गरजेचे आहे. जंगलराज्याचे युवराजही फिरत आहे. मात्र, जनतेने त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नये. ते दहा लाख नोकरी देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, ते स्वत: बेरोजगार आहेत.
दरम्यान, बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. तर मतमोजणी ही 10 नोव्हेंबरला होणार आहे.