जयपूर : भाजपचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष सतीश पूनिया यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. या सरकारच्या काळात राजस्थान हे सामूहिक अत्याचाराची भूमी झाले असल्याचे पूनिया म्हटले.
गुरुवारी पूनिया बैठकीसाठी राज्याच्या भाजप मुख्यालयात आले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, की राज्यात सुशासन राबवायचे असेल, तर काँग्रेस सरकारला पूर्णपणे हटवले गेले पाहिजे. विधानसभेच्या प्रत्येक सत्रापूर्वी आम्ही पक्षाची बैठक बोलावतो आणि त्यात राज्याच्या हिसासंबंधी मुद्द्यांवर चर्चा करतो. गेल्या दोन वर्षांमध्ये सध्याच्या सरकारने आम्हाला विधानसभेत मांडण्यासाठी भरपूर मुद्दे दिले आहेत. मग त्यात कोरोनाची हाताळणी असो, टोळधाड असो किंवा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था असो.
देशभरात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथील जनतेला हाल सोसावे लागत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीयेत, असेही ते म्हणाले. काँग्रेसमधील जुनी आणि नवी विचारसरणी यांच्यामधील कलह सर्वांसमोरच आहे. तसेच, पक्षात सत्तेसाठीही मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. काँग्रेसला स्पष्ट आणि मजबूत नेतृत्त्वाची गरज आहे, असे ते म्हणाले.
अशोक गेहलोत यांच्याबाबत बोलताना पूनिया म्हणाले, की त्यांनी प्रत्येक वेळी टाईमपास म्हणून भाजपवर टीका करण्याऐवजी, आपल्या घराकडे (राज्य) लक्ष द्यावे. तसेच, राहुल गांधींबाबत ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय स्तरावरीय या नेत्याने शेतकऱ्यांना १० दिवसांमध्ये कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे काही न होता शेतकरी अजूनही आत्महत्या करत आहेत.
राजस्थानमध्ये अडीच लाखांहून बलात्कारांच्या घटनांचा तपास होणे अद्याप बाकी आहे. काँग्रेसने जनतेच्या मनातील आपला विश्वास गमावला आहे, असे ते म्हणाले. तसेच, भाजप करत असलेले चांगले काम जनता बघत आहे. त्यामुले देश लवकरच काँग्रेसमुक्त होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.