बंगळुरू : दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या २७० डब्यांचे विलगीकरण कक्षांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. देशामधील विलगीकरण कक्षांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती रेल्वे विभागाच्या एका प्रवक्त्याने दिली.
देशामधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, आपल्याला मोठ्या प्रमाणात विलगीकरण कक्षांची गरज भासणार आहे. देशातील कोणत्याही भागात, लवकरात लवकर विलगीकरण कक्ष उपलब्ध व्हावेत यासाठी रेल्वेच्या डब्यांचे रुपांतरण करण्याचा निर्णय ३० मार्चला घेण्यात आला होता. त्यानुसार दक्षिण-पश्चिम रेल्वेनेही आतापर्यंत २७० डब्यांचे रुपांतर विलगीकरण कक्षांमध्ये करण्यात आले आहेत. एकूण ३१२ डब्यांचे रुपांतर करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती या प्रवक्त्याने दिली.
या डब्यांना सर्व वैद्यकीय निकष लक्षात घेत बदलले जात आहे. एका डब्यामध्ये एकूण आठ विलगीकरण कक्ष तयार होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. या २७० डब्यांपैकी हुबळीच्या वर्कशॉपमध्ये ७६, मैसूरच्या वर्कशॉपमध्ये ७१, बंगळुरू डिविजनमध्ये ६१, मैसूर डिविजनमध्ये २९ आणि हुबळी डिविजनमध्ये ३३ डब्यांचे रुपांतर करण्यात आले आहे.
रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री सुरेश अंगदी हे या कामाची पाहणी करण्यासाठी आज हुबळीमधील वर्कशॉपला भेट देणार असल्याची माहितीही या प्रवक्त्याने दिली.
हेही वाचा : कोरोना संकटाच्या काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राहुल गांधींनी केले कौतूक