नवी दिल्ली - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशभरामध्ये येत्या 14 एप्रिलपर्यंत बंद आहे. लॉकडाऊन मुळे स्थलांतरित कामगार घरी परतत असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
'आपले लाखो भाऊ आणि बहीण आपल्या घराकडे परत जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचा कामधंदा बंद झाला असून त्यांचे भविष्य अनिश्चित आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून शासनाकडे यांच्यासाठी आपत्कालीन योजना नाही', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने दिल्लीत रोजगारासाठी आलेले इतर राज्यांतील कामगार वर्ग मुलाबाळांसह गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. बस, रेल्वे बंद असल्याने स्थलांतरीतांना त्यांच्या मूळ गावी कसे पोहचवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्याने हातावर पोट असणारे अन बेघरांच्या हालअपेष्टा सुरू झाल्या आहेत. मोठ्या संख्येने कामगार आपापल्या शहरांकडे आणि गावाकडे जाणाऱ्या बसेसची वाट पहात आहेत. तर काही कामगार वर्ग पायीच निघाला आहे.